Wednesday, 6 July 2016

'नाईट लाईफ' मुंबईसाठी 'फल'दायक ठरणार?

मुंबई : राजधानी मुंबई 24 तास जागी असतेच... पण केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या नव्या विधेयकामुळं मुंबईच्या नाईट लाईफला गती येणार आहे. दिवसाची मुंबई वेगळी असते... आणि रात्रीची आणखी वेगळी... मायानगरी मुंबईत रात्री फिरण्याची मौज अगदी भारी असते. पण आजही रात्रीच्या वेळी मुंबईत फेरफटका
मारणाऱ्यांची संख्या कमीच आहे. येत्या काही दिवसात मात्र हे चित्र बदलणार आहे. मुंबई 24 X 7 चा अनुभव आता सामान्यांनाही घेता येणार आहे. 'मॉडेल शॉप्स अॅन्ड एस्टॅब्लिशमेंट' विधेयक केंद्रानं मंजूर केलंय. त्यामुळं आता मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह रात्रभर सुरू ठेवण्याची परवानगी मिळालीय. दिवसभर कामावर असणाऱ्यांना पाहिजे त्यावेळी खरेदी करणं, सिनेमाचा आनंद लुटणं, मजा करणं शक्य होणार आहे. पण यानिमित्तानं सुरक्षेचा प्रश्न पुढं आलाय. गेल्या वर्षी नाईट लाईफचा प्रस्ताव पुढं आल्यावर मुंबई पोलिसांनी त्यावर विविध शंका उपस्थित केल्या होत्या. परिणामी नाइट लाइफचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला. पण आता केँद्र सरकारकडूनच नाईट लाईफला हिरवा कंदील मिळाल्यावर मुंबई पोलिसांची भूमिका बदललेली दिसतेय. रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलीस घेणार आहेत.नाईट लाईफमुळे रोजगार, उद्योगाच्या संधी वाढणार आहेत. शिवाय पर्यटनात वाढ होईल. हॉटेल आणि मॉल्स संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलंय. पण, नाईट लाईफची एवढी हवा केल्यानंतरही मॉलमध्ये ग्राहकच आले नाहीत तर? नाईट लाईफचं कल्चर मुंबईला शोभणार आहे. पण हे मॉडेल यशस्वी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल...


No comments:

Post a Comment