Monday 27 June 2016

उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्ण घोषित

मुंबई : अवयवदानाचा टक्का वाढत असताना महापालिका रुग्णालयेही सक्रिय होत आहेत. उपनगरीय रुग्णालयात पहिल्यांदाच राजावाडी रुग्णालयात १६ वर्षीय रुग्णाचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर, या रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले. या
मुलाचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृतदान केल्यामुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे.१६ वर्षीय मुलाचा अपघात झाल्यावर त्याला राजावाडी रुग्णालयात २१ जून रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्याचे डॉक्टरांनी निदान केले. २४ जूनला या मुलाचा मेंदू मृतावस्थेत असल्याचे निदान झाल्यावर २५ जून रोजी त्याला गोदरेज रुग्णालयात हलवण्यात आले. २५ जूनला रात्री पावणेदोनच्या सुमारास या मुलाचे अवयवदान करण्यात आले. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी या मुलाचे हृदय काढण्यात आले आणि अवघ्या २३ मिनिटांत २३ किमीचे अंतर कापून हृदय कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
१६ वर्षीय मुलाचे हृदय ३१ वर्षीय महिलेला प्रत्यारोपित करण्यात आले आहे. हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर कपाडिया यांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. रुग्णाची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यकृत ग्लोबल रुग्णालयातील ७६ वर्षीय पुरुषास देण्यात आले आहे, तर एक मूत्रपिंड गोदरेज रुग्णालयात तर दुसरे मूत्रपिंड जसलोक रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले आहे.घाटकोपर येथील गोदरेज रुग्णालयातून रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी हृदय घेऊन रुग्णवाहिका निघाली. २ वाजून १७ मिनिटांनी हृदय घेऊन रुग्णवाहिका अंधेरी कोकिलाबेन रुग्णालयात पोहोचली.गोदरेज रुग्णालय - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे - छेडा नगर - एस.एल.आर ब्रीज - सीएसटी रोड, कुर्ला - मुंबई विद्यापीठ - हयात हॉटेल - बिसलेरी कंपनी - अंधेरी रेल्वे ब्रीज - आयओसी जंक्शन - चार बंगला - कोकिलाबेन रुग्णालय

No comments:

Post a Comment