Saturday, 25 June 2016

सोलापूरचा प्रवास : ‘शिकागो’ ते ‘स्मार्ट सिटी’

एकेकाळी वस्त्रोद्योगामुळे संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध पावलेल्या सोलापुरात ६० वर्षांपूर्वी जागतिक मंदीमुळे वस्त्रोद्योगाला घरघर लागली, तशी येथील शांतता व सुव्यवस्थाही गंभीर बनली होती. सोलापूर हे भारताचा ‘शिकागो’ होण्याच्या मार्गावर होते. पुढे सुदैवाने तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्याची गंभीर
दखल घेत सोलापूरला पाठविलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकाने स्थानिक गुंडगिरीसह गुन्हेगारी आटोक्यात आणली. त्यामुळे सोलापूरचे ‘शिकागो’ होणे टळले. पुढे हळूहळू झालेल्या वाटचालीतून आता हेच सोलापूर ‘स्मार्ट सिटी’ बनण्यासाठी सिद्ध झाले आहे. १९६०च्या दशकात सोलापुरात गुंडगिरीसह दंगली व इतर गुन्हेगारी उत्तरोत्तर वाढत चालली होती. दररोज सुरामारीचा एकतरी प्रकार घडत असे. सहा कापड गिरण्यांपैकी जवळपास तीन गिरण्या बंद पडल्यामुळे हजारो कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बेकारी व उपासमारीचे संकट ओढवले होते. त्याचा अनिष्ट परिणाम सोलापूरच्या गुन्हेगारीत वाढ होण्यात झाला होता. १९५७ सालच्या एका मार्च महिन्यात १५ खून आणि १२ दरोडे पडले होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत तत्कालीन नेते यशवंतराव चव्हाण यांनी घेतली आणि त्यांनी मुंबईत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर हेंबळे यांना बोलावून घेतले. यशवंतराव चव्हाण त्यांना म्हणाले, ‘सोलापूर भारताचा ‘शिकागो’ होण्याच्या बेतात आहे. तुम्ही ताबडतोब सोलापूरला पोलीस अधीक्षक म्हणून रुजू व्हा. परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याकामी तुम्हाला जी काही मदत लागेल, ती माझ्याकडून मिळेल.’ मधुकर हेंबळे हे तातडीने सोलापुरात रुजू झाले. त्यांनी अतिशय कठोर उपाययोजना करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली. गुन्हेगारीचे पेकाट मोडून काढताना हेंबळे यांनी अल्पावधीतच सोलापुरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. स्वत: हेंबळे यांनी या माहितीचा तपशील आपल्या आत्मचरित्रात भारताचा ‘शिकागो’ सोलापूर या प्रकरणात दिला आहे. ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांनी हेंबळे यांच्या आत्मचरित्रातील सोलापूरविषयीचा तपशील उपलब्ध करून देताना सोलापूरच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. मागील ६० वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक स्थित्यंतरे झाली. गिरणगाव आणि एक मोठे खेडेगाव म्हणून होणारी सोलापूरची हेटाळणी आता थांबली असून, आता हे शहर ‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी सिद्ध झाले आहे. एकीकडे स्मार्ट सिटी बनत असताना अजूनही दुर्दैवाने काही नागरिक सोलापूरविषयी नकारात्मक विचार करतात. वास्तविक पाहता विकासासाठी सोलापुरात मुबलक अनुकूल बाबी आहेत.

No comments:

Post a Comment