मोठे समारंभ, शाही विवाह सोहळे तसेच हॉटेल, रेस्टॉरन्ट आदी ठिकाणी उरलेले अन्न वाया जाऊ नये यासाठी सुरू झालेल्या उपक्रमाचे आता पुढचे पाऊल पडत असून, उरलेले अन्न वाया जाऊ नये यासाठी ‘फूड दोस्ती’ अॅप विकसित करण्यात आले आहे. फूड दोस्ती अॅपचे उद्घाटन शुक्रवारी (८ जुलै) होत असून त्यानंतर उपक्रमाची
व्याप्ती वाढवली जाणार आहे. उरलेले अन्न वाया जाऊ नये आणि मुळात अन्न टाकले जाऊ नये, तसेच अन्न उरलेच तर ते योग्य ठिकाणी पोहोचावे यासाठी ‘माय इंडियन ड्रीम’ या स्वयंसेवी संस्थेने विविध उपक्रम सुरू केले आहेत. विशेषत: हॉटेल व रेस्टॉरन्टस्च्या भटारखान्यात उरलेले अन्न गोळा करण्याचे काम काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते करतात. याच कामाचा पुढचा भाग म्हणून माय इंडियन ड्रीम आणि संवाद सोशल टेक्नॉलॉजिज यांनी ‘फूड दोस्ती’ हे अॅप विकसित केले आहे. या कामाची आवड असणारे स्वयंसेवी वृत्तीचे कार्यकर्ते, नागरिक आणि हॉटेलमालक तसेच हॉटेलमधील ग्राहकवर्ग अशा घटकांना एकत्र आणून अन्न वाया जाऊ नये यासाठी जे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत त्यासाठी या अॅपचा निश्चितपणे उपयोग होणार असल्याची माहिती, संवाद सोशल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक संजीव नेवे यांनी दिली.या संस्थांनी सुरू केलेल्या याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हॉटेल वा रेस्टॉरन्टमधील जे ग्राहक त्यांना दिलेल्या ताटात वा प्लेटमध्ये कोणतेही पदार्थ टाकणार नाहीत त्यांना विशेष सवलत वा भेट देण्याचीही योजना असून त्याला अनेक हॉटेलचालकांनी प्रतिसाद दिला आहे. हॉटेलच्या भटारखान्यात जे अन्नपदार्थ शिल्लक राहतील त्याची माहितीही या अॅपद्वारे देण्याची व्यवस्था असल्यामुळे ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित स्वयंसेवक ते गोळा करतील. त्या बरोबरच ज्या हॉटेलचालकांचा सहभाग होणार आहे त्यातील अनेक जण त्यांच्या हॉटेलमध्ये ग्राहकांनी अन्नपदार्थ वाया जाऊ देऊ नयेत यासंबंधीचे आवाहनही ग्राहकांना करणार आहेत. अनेकदा एक-दोघाजणांनाही गरज नसताना केवळ हॉटेलमधील व्यवस्थेप्रमाणे पदार्थ मागवावे लागतात. अशावेळी पदार्थ वाया जातात. त्यावर उपाय म्हणून पदार्थ मागवतानाच जे ग्राहक तो निम्मा मागवतील त्यांच्यासाठी तशी व्यवस्था करून दिली जाणार आहे. अशा उपक्रमांमुळे एकूणच ग्राहकांचेही प्रबोधन होणार असून अन्न वाया जाता कामा नये, असा संदेश या संपूर्ण उपक्रमातून पोहोचवला जाणार आहे. त्यासाठी ‘फूड दोस्ती’ अॅपचा विशेष उपयोग होईल, असेही नेवे यांनी सांगितले. Thursday, 7 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment