Thursday 7 July 2016

भाऊसाहेब फुंडकरांची मंत्रिपदी वर्णी!

खामगाव: बुलडाणा जिल्ह्याला आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपाने मंत्रिपदाचा लाल दिवा मिळणार आहे. शुक्रवारी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आ. भाऊसाहेब फुंडकरांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणे जवळ-जवळ निश्‍चित झाले असून, या निर्णयामुळे खामगावसह पश्‍चिम वर्‍हाडातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट
निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून ८ जुलै रोजी विस्तार होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ आ. भाऊसाहेब फुंडकर यांचे स्थान निश्‍चित झाले असून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ स्थान आणि त्यांच्या पाठीशी असणारा प्रदीर्घ अनुभव यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी तमाम नागरिकांची आकांक्षा होती. अखेर ती आकांक्षा पूर्ण होताना दिसत असून तीन वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार, दहा वर्षे विरोधी पक्षनेतेपदाचा प्रवास आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी केला आहे. राज्यातील बहुजन चेहरा म्हणून त्यांची ओळख असून शेतकरी आणि कष्टकर्‍यांचे नेते म्हणूनही त्यांची संपूर्ण राज्यभर ख्याती आहे.
जनसंघ ते भाजपा भाऊसाहेबांचा अखंड प्रवास!
भाऊसाहेब फुंडकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची पाळेमुळे बळकट केली आहे. जनसंघ ते भाजपा असा त्यांचा प्रवास असून, आणीबाणीनंतर खर्‍या अर्थाने भाऊसाहेबांनी आपल्या तळागाळातील सहकार्‍यांच्या साथीने पक्ष बळकट केला. १९७१ च्या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. १९७२ ला नागपूर विद्यापीठात खामगावातून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भाऊसाहेबांची सर्वप्रथम निवड झाली . ही त्यांची पहिली निवडणूक होती. आणीबाणीत कारावास भोगल्यानंतर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. तत्कालीन संघटन मंत्री वसंतराव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस प्रश्नावर 'खामगाव ते आमगाव' अशी पदयात्रा काढली. त्यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात होता. खुद्द इंदिरा गांधींचा पराभव होऊनसुद्धा अकोल्यातून वसंतराव साठे काँग्रेसवर विजयी झाले होते. असा हा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळविण्याचे श्रेय भाऊसाहेब फुंडकरांनाच जाते. सलग तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघ त्यांनी भाजपच्या ताब्यात ठेवला. त्यानंतर सातत्याने विधान परिषदेत पक्षाचा व शेतकरी, शेतमजुरांचा आवाज बुलंद केला. पक्षानेही भाऊसाहेबांवर वेळोवेळी मोठी जबाबदारी टाकली. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. तसेच पणन महासंघाचे अध्यक्षपद भूषविले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील भाऊसाहेबांनी सभागृहात आपला ठसा उमटविला. असा दीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या भाऊसाहेबांना अखेर मंत्रिपद मिळाले.

No comments:

Post a Comment