Thursday, 7 July 2016

आम आदमी पक्ष महिलाविरोधी होत आहे- भाजप

नवी दिल्ली - दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष महिला विरोधी होत असून असे प्रकार भारतीय जनता पक्ष कधीही सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील प्रमुख सतिश उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जरवल यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा
गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर उपाध्याय बोलत होते. ते म्हणाले, "त्यांच्याकडे अडचणी घेऊन गेलेल्या महिलेसोबत ते (आप) असभ्य वर्तन करत आहेत. दिल्लीतील लोकांनी काय करावे? अशा प्रकारामुळे फसवणूक झाली म्हणून दिल्लीतील नागरिक दिल्ली सरकारविरूद्ध आंदोलन करतील.‘ तसेच "आम आदमी पक्षाच्या बाबतीत असे प्रकार अनेकदा घडले आहेत. असे प्रकार भाजप सहन करणार नाही‘, असेही उपाध्याय पुढे म्हणाले. दरम्यान जरवल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत तक्रार करणारी महिला आपल्याला मातेसमान असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकारामागे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तसेच "मी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करेन. प्रसंगी तुरुंगात जायलाही तयार आहे‘, असेही जरवल यांनी पुढे म्हटले आहे. यापूर्वी "आप‘च्या एका आमदारावर महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तर पंजाब निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "आप‘ने जाहीर केलेल्या युवा जाहीरनाम्याची तुलना शीखांच्या पवित्र धर्मग्रंथाशी केल्याने आप नेते आशिष खेतान यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याशिवाय इस्लाम धर्मियांचा अवमान केल्याबद्दल आपचे आमदार नरेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment