Wednesday, 6 July 2016

आता भारतासाठी अफ्रिका खंडातील मोझमबिक पिकवणार डाळ

भारतीयांच्या जेवणामध्ये डाळ महत्वाचा अन्नपदार्थ आहे.  भारताची डाळीची वाढती गरज भागवण्यासाठी आता मोझमबिक डाळीचे उत्पादन करणार आहे. मोझमबिक अफ्रिकाखंडातील देश असून, भारत या देशाकडून डाळींची आयात करणार आहे. सध्या एक लाख टनपर्यंत डाळ आयात केली जाते. २०२०-२१ पर्यंत ही आयात
दुप्पट होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मोझमबिकबरोबर तसा दीर्घकाळाचा करार करायला मंजुरी दिली. मोझमबिकमध्ये जे पीक घेतले जाईल त्याची चव भारतीय डाळींसारखीच असेल असे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. भारतात पिकवल्या जाणा-या डाळींची चव पूर्णपणे वेगळी आहे. डाळीच्या उत्पादनासाठी मोझमबिकला उच्च दर्जाचे बियाणे आणि तंत्रज्ञानाचे सहकार्य भारत सरकारकडून देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. या निर्णयामागे डाळीच्या किंमती स्थिर करण्याचा सरकारचा उद्देश आहे. कारण डाळीच्या वाढणा-या किंमतीची सरकारला राजकीय किंमत चुकवावी लागते. भारतासाठी दुस-या देशात डाळीचे उत्पादन घेण्याची चाचपणी करण्यासाठी भारत सरकारने मोझमबिक आणि म्यानमारला पथके पाठवली होती. म्यानमारकडे जी२जी व्यवहाराची व्यवस्था नसल्याने त्यांनी नकार दिला. पण मोझमबिकाने डाळीच्या उत्पादनाची तयारी दाखवली. तिथे पिकवली जाणारी सर्व डाळ खरेदी करण्याचे भारताने आश्वासन दिले आहे. भारतात २०१५-१६मध्ये एक कोटी ७० लाख टन डाळीचे उत्पादन झाले. त्यातून देशांतर्गत गरज भागवण्यासाठी ५० लाख टन डाळ आयात करावी लागली. 

No comments:

Post a Comment