Saturday, 9 July 2016

कोच कुंबळेंच्या सेकंड ‘इनिंग्ज’ला प्रारंभ

 भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्याचा प्रारंभ आज, शनिवारपासून विंडीज बोर्ड एकादशविरुद्धच्या दोन दिवसांच्या सामन्याद्वारे करणार आहे. मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या नव्या इनिंग्जला ४९ दिवसांच्या दौऱ्याने सुरुवात होत असून, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा फिटनेस, तसेच फलंदाजांचा फॉर्म तपासून
पाहण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. विंडीज बोर्ड एकादश संघात कसोटी संघातील सहा खेळाडूंचा भरणा असून, त्यात लियोन जॉन्सन, जर्मेन ब्लॅकवूड, राजेंद्र चंद्रिका, शेन डारिच, शाय होप तसेच जोमेल वॉरिकन यांचा समावेश असल्याने भारतीय संघाला तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. शमी कसोटी सामन्यात गोलंदाजी करण्यायोग्य आहे किंवा नाही हे पहिल्या सराव सामन्याद्वारे स्पष्ट होईल. कर्णधार विराट कोहली याने शमीचे कौतुक करताना सांगितले की, तो कसोटी सामन्यात आदर्श असा अचूक टप्पा राखून गोलंदाजी करतो. ईशांत शर्मा हादेखील दीर्घकाळानंतर संघात परतला आहे. वेगवान माऱ्यासाठी उमेश यादव हा देखील सज्ज आहे. राखीव गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार तसेच शार्दुल ठाकूर हे आहेत. भारतीय संघ एरवी विदेश दौऱ्यावर असतो, त्यावेळी सराव सामन्यात तज्ज्ञ फलंदाज ७५-८० धावा काढून निवृत्त होतात. सर्वांना फलंदाजीचा सराव मिळावा, हा यामागील हेतू असतो. कसोटी सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेला शिखर धवन याचा फॉर्म तपासून पाहण्याची हिच वेळ असल्याचे कुंबळे यांचे मत आहे. त्याच्यासोबत मुरली विजय डावाला सुरुवात करेल. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर मधल्या फळीत सातत्यपूर्ण फलंदाजीची भिस्त आहे. के. एल. राहुल देखील सराव सामन्यात देखणी कामगिरी करीत धवनपुढे आव्हान उभे करण्यास सज्ज आहे. विंडीजच्या मंद खेळपट्ट्यांवर तीन फिरकीपटूंना संधी मिळू शकते. फिटनेसची समस्या नसेल तर अश्विन संघात असेलच, पण रवींद्र जडेजाच्या तुलनेत अमित मिश्रा याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

1 comment: